भंडारा - जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तावशी गावाजवळ काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ९ अंगणवाडी सेविका जखमी झाल्या आहेत. त्यापैकी गंभीर असणाऱ्यांना भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.
लाखांदूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका काळ्या-पिवळ्या टॅक्सीने दिघोरी येथे मोबाईल प्रशिक्षणासाठी जात होत्या. गाडी तावशी गावाजवळ आली असता अचानक टायर फुटल्याने गाडी उलटली. यामध्ये दहेगाव येथील निर्मला खोब्रागडे, पारडीचे अनमोल घोडेस्वार, बोरगावच्या रंजना शेंडे, कोदामेंढीच्या खलीता लांडगे, मानेगावच्या अनिता मेश्राम, मुरमाडीच्या आशा कांबळे, चिकना येथील मयुरी कोचे आणि आशा कांबळे या अंगणवाडी सेविका जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर दिघोरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच त्यापैकी ३ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी अपघाताची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे यांना दिली.