भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात यावेळी केवळ ६८.२७ टक्केच मतदानाची नोंद करण्यात आली. या मतदारसंघातील १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी केवळ १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ७२.२१ टक्के मतदान झाले होते. तुलनेने यंदाच्या निवडणुकीत ३.९४ टक्के मतदान कमी झाले आहे.
मतदारसंघातील १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७४९ पुरुष, तर ६ लाख ८ हजार १४७ महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी मतदान ६४.४१ टक्के मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात झाले, तर सर्वाधिक ७१.६५ टक्के मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात झाले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान -
तुमसर - विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्रावर २ लाख ९९ हजार ३४५ मतदारांपैकी २ लाख १० हजार ३११ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख ८ हजार ६१६ पुरुष, १ लाख १ हजार ६९५ महिला मतदार आहेत. या क्षेत्रात एकूण मतदानाची टक्केवारी ७०.२६ एवढी आहे.
भंडारा - मतदान केंद्रावर ३ लाख ६७ हजार ७५८ मतदारांपैकी २ लाख ४१ हजार ८४४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २४ हजार ४९९ पुरुष आणि १ लाख १ हजार ६९५ महिला मतदार आहेत. तसेच एकूण मतदान ६५.६७ टक्के झाले आहे.
साकोली - विधानसभा क्षेत्रात ३ लाख १६ हजार ४०४ मतदारांपैकी २ लाख २६ हजार ६९९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख १५ हजार ४२९ पुरुष आणि १ लाख ११ हजार २७० महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ७१.६५ एवढी असून लोकसभा क्षेत्रातील सर्वात जास्त टक्केवारी याच साकोली विधान सभा क्षेत्राची आहे.
अर्जुनी मोरगाव - या विधानसभा क्षेत्रात २ लाख ५२ हजार ७७८ मतदारांपैकी १ लाख ८० हजार ५२० मतदारांनी मतदान केले. यामध्ये ९० हजार ९७६ पुरुष आणि ८९ हजार ५४४ महिला मतदार आहेत. या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी ७१.४१ एवढी आहे.
तिरोडा - या विधानसभा क्षेत्रात २ लाख ५४ हजार ७०१ मतदारांपैकी १ लाख ७० हजार ७५९ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ८४ हजार ९३१ पुरुष आणि ८५ हजार ९२८ महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी ६७.०८ एवढी आहे.
गोंदिया - या विधानसभा क्षेत्रात ३ लाख १७ हजार ७३८ मतदारांपैकी २ लाख ४ हजार ६६३ मतदारांनी मतदान केले. यात १ लाख २ हजार २९८ पुरुष आणि १ लाख २ हजार ३६५ महिला मतदार आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी ६४.४१ एवढी आहे.
एकूण सहा विधानसभा मतदार संघातील २ हजार १८४ मतदानकेंद्रावर मतदानाचे काम सुरळीत पार पडले आहे. मतदारांनी त्यांचा कौल कोणाला दिला, हे २३ मे'ला कळेत. तोपर्यंत या मतपेट्या कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.
२०१४ मध्ये भंडारा-गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले हे रिंगणात होते. त्यामुळे मतदारांमध्येही मोठा जोश होता. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यानंतर २०१८ च्या पोट निवडणुकीत केवळ 53.97 टक्के एवढेच मतदान झाले होते. २०१९ ची ही सार्वत्रिक निवडणूक असूनही १४ ही उमेदवार नवखे आहेत. यामध्ये कोणताही मोठा चेहरा नसल्याने २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये जवळपास ४ टक्के मतदान कमी झाले. विशेषतः गोंदिया विधानसभा क्षेत्रात मोदींची विशाल सभा घेण्यात आली होती. मात्र, तिथूनच सर्वात कमी म्हणजे फक्त ६४.४१ टक्केच मतदान झाले.