भंडारा - लाखनी येथे जनता कर्फ्यू दरम्यान एकाची विचारपूस करणे पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याच्या काठीने त्याचेच डोके फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लोकेश ढोक असे जखमी झालेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर मंगेश टिचकुले (वय-30) या आरोपीने हल्ला चढवला.
रविवारी (22 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. लाखनी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस नायक लोकेश ढोक कर्तव्य पार पाडत असताना मुरमाडी येथे महामार्गावर त्यांनी तिघेजण जात असलेल्या एका दुचाकीला आडवले. यानंतर विचारपूस करत असताना आरोपी मंगेश याने लोकेश यांच्याकडील काठी हिसकावून त्यांना मारहाण केली. यामुळे पोलीस कर्मचारी लोकेश ढोक यांना जबर दुखापत झाली आहे.
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मंगेश अमृत टिचकुले या आरोपीविरोधात भादंसं कलम 353, 332 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस करत आहेत.