भंडारा - तुमसर तालुक्याच्या परिसरात मागील 8 दिवसापासून एका वाघाची दहशत पसरली आहे. शनिवारी दुपारी या वाघाने नागरिकांवर हल्ला चढवत 3 लोकांना जखमी केले. यापैकी एकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे या वाघाला पकडून जंगलात सोडावे, अशी मागणी परिसरात नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र ते मध्यप्रदेश या रस्त्यावर बिनाकी गावाजवळ शनिवारी हा वाघ दबा धरून बसला होता. या रस्त्यावरून जाणाऱ्या छोटेलला ठाकरे आणि शंकरलाल तुरकर यांच्या दुचाकीवर या वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच वाघ बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पाहून वाघ चिडला आणि त्याने लोकांवर हल्ला चढविला. त्यावेळी वाघाने वीरेंद्र साखरे या व्यक्तीला खाली पाडले, आणि ही माझी शिकार आहे, अशा ऐटीत त्याच्या अंगावर बसला. त्यावेळी गावकऱ्यांनी धाडस करत वाघाला दगड मारले आणि वाघाने तेथून पळ काढला. या जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला
मागील 8 दिवसांपासून गोंदेखारी, बघेडा, बिनकी, या परिसरात हा वाघ फिरत आहे. अगोदर गोंदेखारी गावाच्या शेजारी वाघ दिसल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या मदतीने या वाघाला पळवून लावले. तेव्हा हा वाघ जंगलाच्या दिशेने गेला असेल, असा अंदाज वनविभागाने बांधला. मात्र, तो जंगलात न जाता याच परिसरात फिरत असल्याने बऱ्याच लोकांना त्याचे दर्शन झाले. हा वाघ चांदपूरच्या जंगलातून किंवा सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलातून आल्याचा अंदाज आहे.
या घटनेनंतर उप वनसंरक्षण अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना आवाहन केले की, सध्या शेतात काम नसल्यास गावकऱ्यांनी शेतात जाण्याचे टाळावे. तसेच वाघ दिसल्यास नागरिकांनी गर्दी न करता वन विभागाला बोलवून घ्यावे. कारण, गर्दी बघितल्यानंतर वाघ पुन्हा हल्ला चढवतो. सध्या आम्ही वाघावर नजर ठेवून असून त्यानुसार उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - भंडाऱ्यात 40 दिवसांपूर्वी हरवलेल्या शाळकरी मुलीचा मृतदेह सापडला; पोलीस तपास सुरू