भंडारा - साकोली तालुक्यातील वडद गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या दोन विद्यार्थीनींचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चौथ्या वर्गात शिकणारी साधना ताराचंद नेवारे (९) आणि सातव्या वर्गात शिकणारी त्रिषाली चोपराम अंबाडारे (12) असे या मृतक मुलींची नावे आहेत. मुरुमासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात त्या बुडाल्या होत्या.
शनिवारी (10 ऑगस्ट) या दोन्ही मुली शाळा सुटल्यानंतर घरी परत आल्या होत्या. त्यानंतर परिसरात खेळत असताना एका लहान मुलीला या दोन्ही मुलींनी तिच्या आई-वडिलांकडे शेतात सोडले. त्यानंतर शेतातून परत येत असताना या दोघींचे पाय चिखलाने भरले असल्याने त्या दोघी पाय धुण्यासाठी जवळच असलेल्या मुरमाच्या खदानीमध्ये गेल्या. या खदानीमध्ये सुमारे १० फुट पाणी होते. पाय धुत असताना त्या पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी २ ते ३ च्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज आहे.
मुली घरी परतल्या नसल्याने त्याच्या पालकांनी आणि गावकर्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र, शनिवारी रात्रीपर्यंत त्या कुठेही आढळून आल्या नाही. रात्री जवळपास १० च्या दरम्यान या खदानच्या पाण्यावर एक चप्पल तरंगताना दिसली. त्यामुळे मुलींचा या पाण्यात पडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी बांधला. खदानीमध्ये जवळपास १० फूट पाणी भरले होते. त्यात मुलींचा शोध घेतला असता, त्या दोघींचेही मृतदेह मिळाले आहेत.
या दोन्ही मुलींच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी या मुली बुडून मरण पावल्या ती जागा महसूल विभागाची आहे. तिथून मुरूम खोदून नेण्यात आला, मात्र खड्डा बुजवला गेला नाही. महसूल विभागाने खड्डा बुजवला असता तर त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून या मुलींचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच आकस्मिक मृत्यूबद्दल कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा गावकरी करीत आहेत.