भंडारा - जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या मोसमात दुसऱयांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. मध्यप्रदेश आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी धरणाचे दरवाजे उघडावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागच्या वीस दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. याच दरम्यान मध्यप्रदेशात पडलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढून धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सहा ऑगस्टपर्यंत सरासरीच्या 79 टक्के पाऊस पडला.
गोसेखुर्द धरणाची सध्याची पाणी पातळी 243. 800 मीटर आहे. ही पातळी कायम ठेवण्यासाठी आज गोसे धरणाचे 33 पैकी 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून 2 हजार 289.19 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या धरणात 409.419 क्यूसेक उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.