बीड - शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय जिल्ह्यात 2 हजार महिला बचत गट तयार करून गोरगरीब, विधवा, परित्यक्ता महिलांच्या जीवनात 'नवचेतना' निर्माण करण्याचे मोठे काम नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या प्रमुख मनीषा घुले यांनी करून दाखवले आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्ज मागायला गेल्यावर गोरगरीब महिलांची चेष्टा केली जाते. शिवाय, ज्या गोरगरीब महिलांकडे बँकेला तारण देण्यासाठी काहीच नसते, अशा महिलांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. हे वास्तव स्वीकारून चार हजार महिलांना एकत्र करत त्यांच्यासाठी बँक स्थापन करून बिगर व्याजी व विनातारण कर्ज देण्याची किमया साधलेल्या मनीषा घुले यांच्या कार्यकर्तृत्वाचा महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
नवचेतना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजया कांबळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातून एखादी विधवा, परित्यक्ता महिला जेव्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे गृह उद्योगासाठी कर्ज मागायला जाते, तेव्हा तिला त्या बँकेत चांगली वागणूक मिळत नाही, हा आमचा जुना अनुभव आहे. या अनुभवातूनच आम्ही ही बँक सुरू केलेली आहे. या बँकेचा आमच्या महिलांनादेखील मोठा अभिमान वाटतो. आतापर्यंत आम्ही पन्नास लाख रुपयांचे कर्ज बिगर व्याजी वाटप केले असून बांगड्याचे दुकान, कपडे, किराणा, झाडू उद्योग असे 500 उद्योग धंदे उभे करण्यासाठी नवचेतना बँकेचा हातभार लागलेला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या.
दोन वर्षांपूर्वी केला नवा प्रयोग
ग्रामीण भागातल्या गोरगरीब व गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी बँका तयार नसल्यामुळे या महिलांना दुसरा पर्याय उरत नाही. अत्यंत दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या या महिलांची उमेद मोठी असते. मात्र, त्यांना हवा असतो मदतीचा हात. अत्यंत प्रामाणिकपणे गृहउद्योग करून कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याचे त्या महिलांचे स्वप्न ओळखून मनीषा घुले यांनी दोन वर्षांपूर्वी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या अंतर्गत 4 हजार महिलांना एकत्र करून एक बँक सुरू केली. या 4 हजार महिलांमध्ये कोणी शेतकरी आत्महत्या कुटुंबातील विधवा महिला आहेत, कोणी परित्यक्ता आहेत. तर, काही महिला विधवा आहेत. या 4 हजार महिलांना बँकेचे सभासद करून त्यांच्या बचत गटाचे व्यवहार त्यांनी सुरू केलेल्या नवचेतना बँकेलाच जोडून घेतले. बीड जिल्ह्यातल्या त्यांच्या 2 हजार महिला बचत गटांचे व्यवहार वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांमध्ये असतो. तो सगळा पैसा त्या महिलांनी सुरू केलेल्या बँकेतच वळवला गेल्यामुळे उद्योग सुरू करू पाहणाऱ्या गोरगरीब महिलांना अर्थसहाय्य करणे, तेही विना तारण करणे शक्य होऊ लागले. यातून शेकडो महिला उद्योजिका बनल्या आहेत. यामध्ये केज शहरातील अर्चना पिंटू मोरे या महिलेने नवचेतना बँकेकडून विनाव्याजी 60 हजार रुपये कर्ज घेऊन झाडू उद्योग केज शहरात सुरू केला असल्याचे मोठ्या अभिमानाने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
ज्यांना कोणी नाही, त्यांना देतो मदतीचा हात
ज्या गोरगरीब महिलांना राष्ट्रीयकृत बँक कर्ज नाकारते, ज्यांच्याकडे तारण ठेवण्यासाठी काही नाही, अथवा मालमत्तादेखील नाही. अशा महिलांना आम्ही विनाव्याजी कर्ज देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही काम करत आहोत. चार ते पाच हजार महिला आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 500 महिलांना कर्ज देऊन त्यांना उद्योगधंद्यासाठी उभे केले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये एका रुपयाचीही शासनाची मदत घेतलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गोरगरीब महिला अत्यंत प्रामाणिकपणे घेतलेले कर्ज फेडत असल्याचा अनुभव गेल्या दोन वर्षात नवचेतना ग्रुपला आला आहे. त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढला असल्याचे नवचेतना ग्रुपच्या प्रमुख मनिषा घुले म्हणाल्या.
हेही वाचा - महिला दिन विशेष : 'ऑटो आय केअर' ॲपची मोहीम; महिलांना मिळणार फ्री ‘रोड साईड असिस्टन्स’