बीड - जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती आहे. ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची सासरवाडी असलेले आणि विशेष म्हणजे सासरेच गावचे सरपंच असलेल्या धनगर जवळकामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी २९ एप्रिलला बीड-नगर मार्गावर धनगरजवळका येथे रास्ता-रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दुष्काळात ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरले जात आहे. ज्या ठिकाणी विहीर व कूपनलिका अधिग्रहण करण्यात आली आहे, त्याचे पाणी काही ठराविक लोकांनाच मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करण्याची मागणीही ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
पाटोदाच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील ज्याठिकाणी कुपनलिकेचे अधिग्रहण केले आहे. ते रद्द करून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी गावात टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. त्याचप्रमाणे अधिग्रहण करण्यात आलेल्या ठिकाणचे आतापर्यंत ग्रामस्थांना पाणीच मिळाले नसल्यामुळे त्याचे देयके अदा करण्यात येऊ नये. तरी प्रशासनाने ग्रामस्थांची पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
या आंदोलनाचे लेखी निवेदन घेवून जाणार्या आंदोलकांना आंदोलन न करण्यासंर्भात पोलिसांकडून नोटीसा देण्यात आले आहे. आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. आम्ही बरेच दिवस झाले विकत पाणी घेत आहोत. आमचे वय झाले आहे. घरात आई व दिव्यांग भाऊ आहे. त्यामुळे विकत पाणी घेणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थ अनंता श्रोते यांनी सांगितले.