बीड - काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे या बीड लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच परळीमध्ये पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना दणका बसण्याची शक्यता आहे. शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आमदार विनायक मेटे यांनी फुलचंद कराड यांची घरी जाऊन भेट घेतली. एक तास फुलचंद कराड व विनायक मेटे यांची बंद दाराआड चर्चा झाली.
मागच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात दुखावलेले भगवान सेनेचे सरसेनापती पंकजा मुंडे यांच्याशी बंड करण्याच्या तयारीत असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात होते. याला मंगळवारी दुजोरा मिळेल अशी घडामोड घडली.
शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे व पंकजा मुंडे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर अनेक वेळा पंकजा मुंडे व विनायक मेटे यांच्यातील गटबाजीचे प्रदर्शन झालेले आहे. विनायक मेटे व पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उफाळून येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये विनायक मेटे यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी जवळीक साधून त्यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यानंतर आता आमदार मेटे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात लक्ष घातले आहे. बीड जिल्हा भाजपचे नेतृत्व पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे करत आहेत. सातत्याने पंकजा मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आमदार मेटे यांनी केलेला आहे.
या चर्चेत नेमके काय शिजले हे मात्र अद्यापपर्यंत बाहेर समजू शकलेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षापासून फुलचंद कराड हे पंकजा मुंडे यांच्याकडून दुखावलेले आहेत. २०१४ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वतः आग्रह करून फुलचंद कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आणले होते. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेच फुलचंद कराड मुंडे भगिनी विरोधात बंड करतील की काय? अशी शंका मेटे-कराड यांच्या भेटीतून निर्माण होऊ लागली आहे.