बीड - नागपूर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरएसएसमधून आलेल्या समीर कुलकर्णी यांना अॅड. बाळासाहेब आंबेडकर उमेदवारी देणार आहेत. बहुजन आघाडीचे संसदीय समिती सद्स्य अण्णा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत यासंबंधीत माहिती दिली. यावेळी बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखती घेण्यासाठी संसदीय सद्स्य समिती स्थापन केली आहे. राज्यात सर्वत्र वंचित समाजातील उमेदवारांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. चारित्र्यसंपन्न आहे. कुठलेही गुन्हे दाखल नाहीत, अशा व्यक्तींना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देईल, असे अण्णा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. उमेदवारांच्या मुलाखतीसाठी संसदीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी बीड येथे आली होती. यामध्ये अण्णा पाटील, अशोक सोनवणे, किशोर चव्हाण आणि रेखा ठाकूर यांचा समावेश होता.
मानेंच्या आरोपाला पुष्टी; संघाच्या स्वयंसेवकाला वंचितची उमेदवारी -
बहुजन आघाडीमधून नुकतेच लक्ष्मण माने हे बाहेर पडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेल्या व्यक्तींना पक्षात उमेदवारी देऊन मोठे केले जात आहे, असा आरोप लक्ष्मण माने यांनी यापूर्वी केलेला होता. मात्र, आता पुन्हा नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले समीर कुलकर्णी यांना उमेदवारी देत असल्याने याची मोठी चर्चा राज्यभरात होत आहे. यानिमित्ताने समीर कुलकर्णी हे वंचित समाजात मोडतात का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे