परळी (बीड) - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भांडवलदारांच्या फायद्यासाठी केलेल्या कायद्याच्या विरोधात व शेतकऱ्यांंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन -
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या आडून सर्व देशवासीयांना घरामध्ये बंद करुन, संसदेमध्ये शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे व भांडवलदारांना फायदा पोहोचवणारे तिन कृषी कायदे मंजूर केले आहेत. या कायद्याच्या विरोधात गेल्या शंभर दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान 200च्यावर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीसुध्दा गेंड्याची कातडी पांघरलेले संवेदनाशुन्य हे मोदी सरकार फक्त निरर्थक चर्चा करत आहे. या चर्चेतुन कसलाही तोडगा निघत नाही, म्हणुन केंद्र सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाविरुध्द भव्य धरणे आंदोलन करण्यात आले, असे वंचितचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी सांगितले.
हेही वाचा - विशेष: रेल्वे मार्ग हागणदारी मुक्तीकडे, 75 टक्के नागरिकांकडून शौचालयाचा वापर
या आंदोलनात प्रसन्नजीत रोडे, संजय गवळी, गौतम साळवे, अमोल बनसोडे, साहेबराव रोडे, राजेश सरवदे, धम्मानंद क्षीरसागर, अविनाश मुंडे, राहुल बचाटे, युनुस शेख, आनुरुध काजळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.