बीड - जिल्ह्यातील धारूर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नद्यांना पूर आला आहे. धारूर तालुक्यातील अनेक भागात आज दुपारनंतर अवकाळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील आवरगाव, पांगरी, हसणाबाद, भोगलवाडी, थेटेगव्हाण येथील अनेक नद्यांना पुर आला आहे. तर नद्या, नाल्या, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. या अवकाळी पावसादरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारे व विजांचा कडकडात पाहायला मिळाला. धारूर शहरातील बस स्थानक परिसरात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. झालेल्या पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय गावरान आंब्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.
नुकसानभरपाईची मागणी -
धारुर तालुक्यातील फळपीक धारक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी धारुर तालुक्यातील शेतकरी बाबुराव गोरे यांनी यावेळी केली. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडेदेखील उन्मळून पडली होती.
हेही वाचा - 'मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच, माहिती न घेता भाजपची भ्रष्टाचाराची बोंब'