बीड- बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दीडशेहून अधिक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावात होणारे वाद, तंटे याला फाटा देत महिलांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. जिल्ह्यातील कोळवाडीमध्ये महिलांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. गावात महिलांचे एकूण 18 बचत गट आहेत, निवडणूक बिनविरोध होण्यामागे या बचत गटांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे या महिलांनी सांगितले.
बीडपासून जवळच असलेल्या कोळवाडी या गावाची लोकसंख्या अंदाजे पंधराशेच्या आसपास आहे. गावात सात सदस्यांची ग्रामपंचयात आहे. निवडणूक म्हटले की वाद, तंटे आलेच, मात्र या सर्वांना फाटा देत कोळवाडीची ग्रामपंचायत निवडणूक यंदा बिनविरोध पार पडली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. 2019 मध्ये राज्य शासनाचा स्वच्छ गाव, सुंदर गाव हा पुरस्कार कोळवाडीला मिळाला आणि तेव्हापासून येथील ग्रामस्थांनी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला.
महिला बचत गटांच्या पुढाकारातून ग्रमपंचायत निवडणूक बिनविरोध
यंदा कोळवाडी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार होती. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि गावातील महिला बचत गटांची एक बैठक झाली. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी व सदस्यांमध्ये तीन ते चार महिलांना प्रतिनिधित्व देण्यात यावे असा प्रस्ताव या महिलांनी बैठकीमध्ये ठेवला. हा प्रस्ताव गावातील पुढाऱ्यांनी मान्य देखील केला व निवडणूक बिनविरोध पार पडली. सात पैकी सहा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले गेले, एक जागा ओबीसीसाठी राखीव आहे. मात्र त्या जागेवर उमेदवारच मिळाला नाही, त्यामुळे ओबीसीच्या एका जागेची निवड प्रक्रिया झाली नाही. मात्र उर्वरित सहा ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य गावाच्या सहमतीने निवडले गेले आहेत.
विकासासाठी एकत्र आलो
केवळ येथील बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला म्हणून आम्ही आमच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करू शकलो. अशी भावना येथील नागरिक तुळशीदास शिंदे यांनी व्यक्ती केली आहे. तर गावच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. निवडणुका म्हटलं की, गावात भांडण-तंटे होतात, त्या सगळ्यांना फाटा देऊन गावासाठी नवीन काहीतरी करायचं म्हणून आम्ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया कोळवाडी येथील रहिवाशी व बचत गटाच्या सदस्या अंतिकाबाई चव्हाण यांनी दिली आहे.