बीड- लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व घटक पक्ष ठामपणे उभे आहेत, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. बीड मतदारसंघात प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत असा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की मागील पाच वर्षात बीडचा विकास झालेला आहे. प्रीतम मुंडे यांनी चांगली कामे केलेली आहेत. शहरात जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावले आहेत. याशिवाय रेल्वेचे काम देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्हीच निकाली काढला असल्याचेही त्या म्हणाल्या.
महायुतीत असतानादेखील भाजपच्या विरोधात मित्रपक्ष प्रचार करत असल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या,की ज्याचा त्याचा प्रश्न आहे की, त्यांनी आम्हाला मदत करायची की नाही. त्यामुळे याबाबत एवढेच सांगेल की, जे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत त्यांच्यासह आम्ही बीड जिल्ह्यात प्रचार करत आहोत. असे पंकजा मुंडे यांनी आमदार विनायक मेटे यांचे नाव न घेता सांगितले.
एक महिला खासदार म्हणून प्रीतम मुंडेंचा बीड जिल्ह्यात सर्वत्र गौरव केला जात आहे. असे पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, रिपाई चे पप्पू कागदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांची उपस्थिती होती.