बीड- नदीच्या पाण्यामध्ये विजेचा शॉक देऊन मासे पकडत असताना दोन युवक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. धारूर तालुक्यात काळ्याची वाडी येथील नदीवर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. चक्क नदीत विजेचा प्रवाह सोडून चुकीच्या पद्धतीने मासेमारी करणे या युवकांच्या जीवावर बेतले आहे. सहदेव रुपनर ( वय- २३ ), दिपक मारुती रुपनर (वय- २२ ) अशी मृतांची नावे आहेत.
जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे गुरुवारी नदीत विजेचा प्रवाह सोडून मासे पकडत होते. याच विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. यंदा पाऊस चांगला झाल्याने डोंगरात वाहणाऱ्या नदी-ओढ्यांना चांगले पाणी आहे. या नदीच्या ओढ्यात माशांचे प्रमाण जास्त असल्याने या तरुणांनी मासेमारी करण्यासाठी नदीत विजेचा प्रवाह सोडला होता. याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी अंधार पडूनही दोघे घरी परतले नाही, त्यामुळे कुटुंबीय शोध घेत होते. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्रकरणाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.