बीड : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले होते. मात्र, प्रयोग शाळेकडून पाठवलेला रिपोर्ट येण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. या रुग्णांचा अहवाल काही तासातच प्राप्त होईल.
जिल्ह्याच्या गेवराई येथील एक व्यक्ती डेंग्यूची लागण झाली म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. तर, दुसरी महिला रुग्ण हृदयविकाराने पीडित होती. हे दोन्ही रुग्ण बुधवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होते. गेवराईच्या रुग्णाच्या फुफ्फुसात पाणी झाले होते. या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोणाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. मात्र, अहवाल येण्यापूर्वी या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे कळेल. जोपर्यंत कोरोना चाचणीचे रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे सांगता येणार नाहीत, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.