बीड - गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण येथे मंगळवारी दुपारी घडली. लखन महादेव पोटभरे ( वय ११) व रोहन परमेश्वर मस्के (वय १०) अशी त्या मृत मुलांची नावे आहेत.
या घटनेची मिळालेेली माहिती, गव्हाण गावाला चिकटून जुनी विहीर आहे. या विहिरीतूनच संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होतो. या विहिरीवर गावातील मुले दररोज पोहण्यासाठी जातात. मंगळवारी दुपारी लखन पोटभरे व रोहन मस्के हे दोघे अन्य एका मित्रासोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेले. पावसामुळे ४० फूट विहीर पाण्याने तुडूंब भरलेली आहे. या विहिरीत रोहनने उडी घेतली. नाकातोंडात पाणी गेल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी पाठोपाठ लखननेही विहिरीत उडी घेतली. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू झाला.
ही माहिती त्यांच्या सोबत असलेल्या तिसऱ्या मुलाने गावात धाव घेत रोहन व लखन बुडाल्याची दिली. त्यानंतर गावातील तरुणांनी विहिरीकडे धाव घेतली. काही तरूणांनी विहिरीत उड्या घेऊन बुडालेल्या दोघांनाही बाहेर काढून तातडीने खासगी वाहनातून वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वडवणी ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश टाक व सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतली.
दोघांच्या मृत्यूने गावावर दु:खाचे सावट -
मृत लखन पोटभरे इयत्ता पाचवीमध्ये तर रोहन मस्के हा चौथीच्या वर्गात शिकत होता. दोघांचीही घट्ट मैत्री होती. एकाचवेळी दोघांच्या मृत्यूने गावावर दु:खाचे सावट पसरले आहे. वडवणी येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याने येथील ग्रामस्थ शोकमग्न झाले होते.