बीड - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता गुंतेगाव फाटा येथे घडली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी आहेत. दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा पाय निकामी झाला आहे, तर एकावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विठ्ठल आबाजी केसरकर (रा. कुरण ता. गेवराई), विठ्ठल मारुती हाके (रा. कुरण) असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, टिप्पर (एमएच १२ ८७४६) चकलंबाकडून गुंतेगावकडे वाळू आणण्यासाठी चालले होते. या दरम्यान विठ्ठल केसकर व विठ्ठल हाके हे दोघेजण गुंतेगावहून चकलंबाकडे मोटरसायकलवरून (एम एच २० बी आर- २८०९) चकलंबाकडे चालले होते. समोरून आलेल्या वाळूच्या टिप्परने धडक दिल्याने दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. यामध्ये विठ्ठल आबाजी केसरकर यांचा एक पाय निकामी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. तर विठ्ठल हाके यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर वाळूचे टिप्पर चकलांबा पोलीस ठाण्यात लावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी वाळू साठ्यावर मोठी कारवाई केली. असे असताना देखील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. याकडे गेवराईचे तहसील प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.