बीड - बीडमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत लॉकडाऊन विरोधात संघर्ष समिती स्थापन केली आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन उठवून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा मंगळवारपासून आम्ही दुकाने सुरू करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. शुक्रवारी याबाबत लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदन दिले आहे. जिल्हा प्रशासन या सगळ्या परिस्थितीबाबत काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या बीड जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता लॉकडाऊन आहे. मागील वर्षभरापासून सतत लॉकडाऊन व निर्बंध लागू आहेत. परिणामी छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने यापुढे बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यापाऱ्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षभरापासून सतत लॉकडाऊन लावण्यात येत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी शासनाकडून दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्यापाऱ्यांनी केले आहे. मात्र आता वर्ष उलटले तरी कोरोनाची स्थिती जशीच्या तशी आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे व्यवसायिक हतबल झाले आहेत. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला विक्रेते, हातगाडी विक्रेते, असंघटित कामगार, शैक्षणिक क्लासेस, लघु उद्योग सुरू करण्यासंदर्भात मान्यता द्यावी.
कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?
बीड शहरातील व जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेले आहेत. आशा परस्थितीत सतत लॉकडाऊन लागत असल्यामुळे बँकेचे हप्ते भरायचे कसे? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - "आधी भाजपचे नेते बोलतात, नंतर एनआयएकडून माहिती बाहेर येते; हा काय प्रकार?"