बीड- केंद्र सरकारने 'जीएसटी'मध्ये अनेक किचकट अटींचा समावेश केल्याने, प्रचंड त्रास होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या विरोधात शुक्रवारी राज्यभरात बंद पुकारण्यात आला होता, या बंदला बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, धारूर या तालुक्यातील व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून या संपामध्ये सहभागी झाले.
यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने जीएसटी लागू करत असताना व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल असा शब्द दिला होता. मात्र प्रत्यक्षात जीएसटी लागू झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या जाचक अटीमुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून देखील सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, यापुढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा बीड व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या बंदमध्ये मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले होते.