बीड - जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लावल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी बीडमधील पर्यावरण तज्ज्ञ शंतनू शिवलाल मुळूक यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शंतनू यांच्या आई हेमलता मुळूक यांनी म्हटले आहे की, 'शंतनू कुठलेच चुकीचे काम करणार नाही. याचा मला विश्वास आहे. मीदेखील एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देते,' असे हेमलता मुळूक यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.
बीड येथील मूळ रहिवासी असलेले शंतनू मुळूक यांचा पर्यावरणाचा चांगला अभ्यास आहे. 2001 मध्ये त्यांनी बीड येथे 10 वी चे शिक्षण पूर्ण केले. पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. एवढेच नाही तर, विदेशात त्यांनी एअर स्पेस या विषयात मास्टर डिग्री घेतलेली आहे. शेतकरी कुटुंबातील शंतनु यांचा पर्यावरणाबाबत चांगला अभ्यास असून भारतातील पर्यावरणाचा ऱ्हास होतो, म्हणून त्यांनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे, असेही त्याच्या कुटुंबीयांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
काय आहे टूलकिट?
टूलकिट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर चर्चेत टुलकिट चर्चेत आले होते. शेतकरी आंदोलनाबाबत टुलकिट सोशल मीडियावरून पसरवल्याचा आरोप दिशा रवी हिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुलकिट प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात दिशा रवी ही एक प्रमुख आरोपी आहे. टुलकिट सोशल मीडियावरून पसरवण्याबरोबरच त्यात दुरुस्ती केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सायबर पोलिसांचे विशेष पथक आरोपीची कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपास करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शंतनू मुळूकही यातील आरोपी असल्याच्या दिशेने तपास सुरू आहे.