बीड - केज तालुक्यातील सोने सांगवी येथे घरातील गॅसचा अचानक भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून, सासू-सुनेसह एक मुलगी यामध्ये जखमी झाली आहे. गॅस टाकी लीक झाल्याने हा भडका उडाल्याचे समोर आले आहे.
तीन जण जखमी
केज तालुक्यातील सोने सांगवी येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास विष्णू बाजीराव कणसे यांच्या घरातील गॅसचा अचानक भडका उडाला. गॅसने अचानक पेट घेतल्याने घरातील व्यक्तींची धावपळ झाली. दरम्यान, घरातील विष्णू कणसे यांच्या पत्नीने व सुनेने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. यामध्ये विष्णू यांची पत्नी, सासू व एक मुलगी यामध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले आहे.
तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दिली भेट
या घटनेत रोख रकमेसह घरातील बरेच साहित्य जळाले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विष्णू कणसे यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असून, येथील तलाठी व मंडळाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
हेही वाचा - मुंबई पेट्रोलच्या दराने ओलांडले शतक; सामान्यांच्या खिशाला कात्री