बीड - मागील वर्षभरात कोरोनाच्या संकटामुळे राज्यात सर्वत्र टाळेबंदी होती. याच दरम्यान व्यवसाय धोक्यात आल्यामुळे घेतलेले कर्ज फिटणार कसे? या विवंचनेतून एका कापड व्यापाऱ्याने स्वतःच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. याबाबत बीड तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वास्तव समोर येत आहे.
कर्ज कसे फेडायचे? नेहमी याच विवंचनेत -
गिरीश गणेश शिंदे (वय 39 हल्ली मुक्काम चौसाळा) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. गिरीश यांचे बीड तालुक्यातील चौसाळा येथे कपड्याचे दुकान आहे. मागील वर्षभरात सतत कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदी असल्याने दुकान बंद ठेवावे लागले होते. यातच घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत अनेक दिवसांपासून गिरीश हे असायचे. अखेर सोमवारी रात्री उशिरा कुटुंबीय जेवण करुन झोपी गेले. याच दरम्यान गिरीश यांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत्या घरी दरवाज्याच्या कडीला दोरी व टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या -
मध्यरात्री दोन वाजता गिरीश यांची आई या वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी आरडाओरड केल्यानंतर कुटुंबातील सर्व लोक धावत आले व त्यांनी गिरीश यांचा गळफास काढून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. गिरीश यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. अशी नोंद नेकनूर पोलीस ठाणे येथे झाली. असल्याचे चौसाळा चौकीचे हवालदार बाबासाहेब डोंगरे यांनी सांगितले.
हेही वाचा - बीड : कार-ट्रॅव्हल्सच्या अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू