बीड - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा वचक राहिला नसल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री गेवराई तालुक्यातील बोरगाव शिवारात वाळूमाफियांनी चक्क तहसीलदारांच्या पथकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यामध्ये तलाठी व कर्मचारी जखमी झाले आहेत.
पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण -
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी रात्री उशिरा गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे आपल्या पथकासह तालुक्यातील बोरगाव शिवारात गेले होते. नगर जिल्ह्यातील वाळू माफियांनी या पथकावर हल्ला करून पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात काही जण जखमी झाले.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांची मुजोरी सुरूच आहे. यापूर्वी पोलिसांसमोर अवैध वाळू वाहतूक केली जायची. मात्र कारवाई केली जात नव्हती. गेवराई तालुक्यातील बोरगाव शिवारात वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या पथकालाच मारहाण केली. यात तलाठ्यासह काही कर्मचारी जखमी झाले आहेत.
वाळू माफियांची मुजोरी -
महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादाने पोसलेले वाळू माफिया आता महसूल विभागावरच उलटली आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी आला. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
हेही वाचा- लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना
हेही वाचा- जालन्यातील सीताफळांना दिल्लीत मिळतोय चौपट भाव; "विकेल ते पिकेल" धोरणाचा झाला फायदा