बीड : जिल्ह्यात मोठा बॅंक घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या आंबेजोगाई, परळी शहर आणि परिसरात स्वराज्य जीआरबी घोटाळा सध्या चांगलाच गाजत आहे. 100 दिवसात दीड पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवून अनेकांचे पैसे गोळा करण्यात आले. सुरुवातीला काही जणांना चांगला परतावा मिळाला. पण मोठी गुंतवणूक झाल्यानंतर ही कंपनी पैसे देत नसल्यामुळे ठेवीदारांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. रिटायर्ड लोकं, गृहिणी यासह अनेकांनी यामध्ये पैसा गुंतवला. मात्र यामध्ये सर्व सामान्य नागरिकांची मोठी फसवणूक करण्यात आली.
बॅंकेने दिले आमिष : स्वराज्य जीआरबी या कंपनीने शंभर दिवसांमध्ये परतावा दीडपट मिळत असल्याचे आमिष दाखवले. या आमिषाला शेकडो लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक केली. गणेश राजाराम भिसे हा कंपनीमध्ये संचालक भागीदार होता. सुरुवातीला या कंपनीने अनेक ठेवीदारांना चांगला परतावा दिला. हळुहळु गुंतवणूकदार वाढत गेले. करोडो रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. पण जशी गुंतवणूक वाढली, तशा गेल्या आठ महिन्यांपासून अनेक ठेवीदारांच्या मुदती संपून देखील परतावाच मिळाला नाही.
सर्व सामान्यांचा कष्टाचा पैसा : अंबाजोगाईचे निवृत्त शिक्षक मधु शिनगारे यांनी या कंपनीत सुरुवातीला तीन लाखाची गुंतवणूक केली. तीन लाखाच्या गुंतवणुकीनंतर शंभर दिवसांमध्ये त्यांना दीडपट परतावा मिळाला. यामुळे त्यांचा कंपनीवर विश्वास बसला आणि नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या नावावर जमा रक्कम दीडपट होईल या हेतूने जीआरबीमध्ये गुंतवली. त्यांना 32 लाख रुपयांचा परतावा मिळणार होता.
गृहिणीची 23 लाखांची गुंतवणूक : गुंतवणूकदार गृहिणी असलेल्या प्रतिभा म्हस्के यांचे पती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. आपले घर चांगले व्हावे या उद्देशाने त्यांनी देखील काही लाख रुपये या कंपनीमध्ये गुंतवले. गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीला प्रतिभा म्हस्के यांना देखील चांगला परतावा मिळाला. परतावा मिळाल्यामुळे त्यांनी तब्बल 23 लाख रुपयांची गुंतवणूक केली. आपल्या घरातच स्वप्न पूर्ण होईल आणि उत्कृष्ट घर मिळेल या आशेने त्यांनीही गुंतवणूक केली. मधु शिनगारे आणि प्रतिभा म्हस्के या दोघांनाही पैसे परत मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारकडे हस्तक्षेप करुन आपल्या मेहनतीचा पैसा परत मिळावा अशी विनंती केली आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक : स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूक केली होती, त्या गुंतवणुकीच्या याच्यामध्ये माझी फसवणूक झाल्याचा मला लक्षात आले आहे, आमचे जे पैसे गोळा केले होते ते पैसे त्यांच्या फाउंडर लीडरच्या नावाने वर्ग करून ते फरार झालेले आहेत, यांच्यावर 420 चे गुन्हे नोंद करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असल्याचे गुंतवणूकदार मधु शिंगारे आणि जय पंढरीनाथ साळवे यांनी सांगितले.
कोण आहे गणेश राजाराम भिसे : जीआरबी म्हणजे गणेश राजाराम भिसे पाटील, हे मूळचे परळीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश राजाराम भिसे पाटील आणि त्यांच्या पत्नीने स्वराज्य नावाची कंपनी स्थापन केली. शेळीपालन, पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, बँकिंग प्लॉटिंग असे प्रोजेक्ट सुरू असल्याचा कंपनीने दावा केला आहे. सुरुवातीला शंभर दिवसांमध्ये दीडपट परतावा देण्याची योजना सुरु केली. पण काही दिवसानंतर 120 दिवसाला दाम दीडपट योजनेच आणली, पुन्हा बदल करत 150 दिवस 200 दिवसाला दीडपट अशी योजना सुरु केली.
हजारो लोकांनी केली गुंतवणूक : मधु शिनगारे आणि प्रतिभा म्हस्के हे दोघंच नाही तर परळी,आंबेजोगाई शहर आणि परिसरातील अनेकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अनेकांनी दागिने विकून, आपली शेती गहाण ठेवून पैसे गुंतवले आहेत. हा आकडा करोडो मध्ये असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 2000 हून अधिक लोकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. तक्रारीवरून गणेश राजाराम भिसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे धक्कादायक म्हणजे या कार्यालयाला टाळं लागलं असून कर्मचारीही या ठिकाणी नसल्याने लोकांना धक्काच बसला आहे.
जिल्ह्यातील अगोदरचे घोटाळे : बीड जिल्ह्यात या अगोदर सर्वात मोठा घोटाळे झाले होते, ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा घोटाळा हिना शाहीन बँक घोटाळा, चंपावती बँक घोटाळा, मैत्रेय घोटाळा, जीवन समृद्धी घोटाळा यांचा समावेश होतो. याप्रकारे अनेक बँका व फायनान्स येऊन बीड जिल्ह्यातील लोकांना आमिषाला बळी पाडून कोट्यावधी रुपये घोटाळा करून पसार होतात. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी आपल्या कष्टाच्या पैसा सुरक्षित व चांगल्या ठिकाणी त्याची गुंतवणूक करावी, तसेच भविष्यात अशा अडचणीला सामोरे जावे लागणार नाही ही काळजी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा : HDFC BANK : एचडीएफसी बॅंकेने गृह आणि वाहन कर्जाचे दर वाढविले