बीड - आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीपासून दूर जात सवतासुभा उभारण्याची तयारी केली आहे. शुक्रवारी बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आमदार क्षीरसागर यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमदार क्षीरसागर यांच्या संस्थेवरील कर्मचारी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या गटाने गुरुवारी तक्रार केली.
आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. प्रचाराच्या कामाला या शैक्षणिक संस्थेवरील कर्मचारी वापरले जात असल्याचा आरोप देखील पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत पुतणे संदीप क्षीरसागर यांचे समर्थक भैय्यासाहेब मोरे व स्वीय सहाय्यक माणिक खांडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आमदार जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे ५ एप्रिल रोजी बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहेत. या मेळाव्यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेवरील शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे मेळाव्याच्या कामकाजासाठी वापरण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दक्ष राहून कारवाई करावी अशी मागणी पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी केली आहे.