बीड - जिल्ह्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याबाहेर सोमवारी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. साखर कारखान्यांनी गाळपासाठी नेलेल्या उसाला पहिला हप्ता 2500 रुपये प्रतिटन याप्रमाणे द्यावा,अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यानं पहिला हप्ता 1600 रुपये देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी एकत्र आले असून, संतप्त शेतकऱ्यांनी गाळप बंदची हाक दिली आहे. साखर कारखान्याच्या गेटसमोर ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी धरणे आंदोलन केलं. या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उसाला प्रतिटन 2500 रुपयांचा दर देण्याची मागणी
माजलगाव मतदारसंघात लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना, छत्रपती साखर कारखाना, जय महेश शुगर असे तीन कारखाने आहेत. यामध्ये यावर्षी गाळपासाठी नेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्यानं 1609 रुपये प्रति टन पहिला हप्ता दिला आहे. तर छत्रपती कारखान्याने 1900 रुपये व जय महेशनं 2000 रुपये पहिला हप्ता दिला आहे. मात्र यामध्ये लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने उसाचा पहिला हप्ता कमी दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विविध मागण्यांसाठी आंदोलन
शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता 2500 रुपये प्रति टन द्यावा, एफआरपीप्रमाणे उसाचा दर आठ दिवसांत जाहीर करावा, शेतकऱ्यांना उसाचं बिल 15 दिवसांत द्यावं, साखर उत्पादनाशिवाय कारखान्यानं जे काही विविध प्रकल्प सुरू केले आहेत, त्याची माहिती संकेत स्थळावर प्रसिद्ध करावी, सभासद शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्यानं नेण्यात यावा, या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी आंदोलन केले आहे.