बीड - देशात कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात होताच शासनाने सर्वात प्रथम शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मार्च महिन्यापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. तब्बल चार महिन्यांपासून सर्व विद्यार्थी घरातच आहेत. सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे जोमात सुरू आहेत. शाळा बंद असल्यामुळे घरी असलेली बच्चेकंपनी आपल्या आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यातील आंबील वडगाव येथे पहायला मिळाले.
यंदा बीड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला. संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी बळीराजाच्या शेतातील कामे सुरूच आहेत. वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची पेरणी अगदी वेळेत झाली. सध्या कापसाला खत घालणे, सोयाबीन खुरपणी व इतर आंतर मशागतीची कामे सुरू आहेत. शाळा बंद असल्यामुळे पोरांचे नुकसान होत असल्याची जाणीव शेतकरी बापाला आहे. त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे आर्थिक चणचणही आहे. शेतात मजूर लावायचे तर मजुरीसाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. अशा बिकट परिस्थितीत घरातील मुलांनी शेतातली छोटी-मोठी कामे केल्याने शेतकरी बापाला आधारच वाटत आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूरपासून जवळच असलेल्या आंबिल वडगावचे रहिवासी असलेल्या कापसे कुटुंबीयांकडे आठ-दहा एकर जमीन आहे. कोरोना लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर कापसे कुटुंबातील काही मुलं शहरात तर काही जण नेकनुर येथे शिक्षणासाठी राहात होते. मात्र, लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालये बंद झाली व सगळी मुले(विद्यार्थी) त्यांच्या मूळगावी वास्तव्यासाठी आली. चार महिन्यांपासून ही बच्चेकंपनी घरातच आहे. घरी राहून अभ्यास करण्याबरोबरच आपल्या आई-वडिलांना शेतीच्या कामासाठी मदत करत असल्याचे, बीड येथे पॉलिटेक्निक कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या प्रांजल कापसे हिने सांगितले. मुलांचा शेतीच्या कामाला हातभार लागत असला तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचे वाईट वाटत असल्याचे शेतकरी रायचंद कापसे यांनी सांगितले.
आंबिल वडगावसारखीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दिसत आहे. मुले आपला ऑनलाइन अभ्यास सांभाळत शेतीची कामे, जनावरांची देखभाल आणि घरातील इतर कामे करण्यास आई-वडिलांना मदत करत आहेत. हे कोरोनाचे संकट लवकर टळावे आणि शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू व्हावीत, अशी इच्छा पालक आणि विद्यार्थी व्यक्त करत आहेत.