बीड: महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आणि विज ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिकांना पाणी देण्याच्या दिवसात महावितरणकडून कृषीपंपाचे विज कनेक्शन तोडले जात आहे. ही सक्तीची वसुली बंद करा, तोडलेले विज कनेक्शन परत जोडा. सर्व मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर येणाऱ्या काळात असहकार आंदोलन करुन रस्त्यावर उतरु, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला.
शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करत विजयसिंह पंडित यांनी शेतकऱ्यांसह आंदोलन केले आहे. वीजवितरण कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे शेतकऱ्यांचे अंदोलन आहे. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न आहे. वीजतोडणीचा धडाका लावला आहे. त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे. कांदा लावलाय पण पाणी द्यायला लाईट नाही. राज्याचा कृषी मंत्री दळभद्री भेटला आहे. असे लोक सत्तेत बसल्यामुळे शेतकरी नाडला आहे.
कारभारात सुधारणा केली नाही: शेतकऱ्यांचे त्यांना कसलेही देणेघेणे नाही. यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार साहेबांसारखे मुख्यमंत्री या राज्याला भेटले. त्यांनी महाराष्ट्राचे कल्याण केले, पण विद्यमान मुख्यमंत्री वेगळ्याच अविर्भावात आहेत. महावितरणने कारभारात सुधारणा केली नाही. महावितरणच्या विरोधात असहकार धोरण राबवले जाईल. विज तोडणी तात्काळ बंद करा. 8 तास विज मिळाली पाहिजे. लाईट 10- 10 वेळेस बंद पडते. तुम्ही हक्काने बील मागता मग लाईट का रेग्युलर देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या मागण्या मान्य करा: माझा इंगा तुम्हाला माहित नाही, मी नुसते कागद काळे करत नाही तर मी तुमचे तोंड देखील काळे करील. शेतकरी आज अडचणीत आहे. विमा नाही, नुकसान भरपाई नाही. अशा परिस्थितीत तुमचे वागणे चुकीचे आहे. निवडणूक आली म्हणून आम्ही आंदोलन करत आहेत. हे डोक्यातून काढून टाका. तुमचे काम व्यवस्थित करा. मुजोरी थांबवा, सहन केली जाणार नाही. पुढील काळात या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु. लवकरात लवकर अंमलबजावणी करा. हे आंदोलन संपलेले नाही, असेही ते म्हणाले आहेत.
विविध मागण्यांचे निवेदन: यावेळी कृषीपंपाची विज तोडणी रद्द करा, दिवसा सुरु असलेले भारनियमन बंद करा, सक्तीची सुलतानी वसुली थांबवा, तोडलेले विज कनेक्शन तात्काळ जोडून द्या, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर 3 दिवसात दुरुस्त करून द्या, अशा विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे अभियंता कापुरे यांना दिले आहे.