बीड - तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट दारू बनविणाऱ्या एका कारखान्यावर बुधवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यामध्ये शेकडो लिटर बनावट दारू सापडली आहे. या बनावट दारू कारखान्याचे मालक कोण हे अजून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड-नाथापूर मार्गावर नागापूर जवळील एका इमारती मध्ये बनावट दारू बनवत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागाचे अधिकारी नितीन धार्मिक यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड, जालना व औरंगाबादच्या विभागीय भरारी पथकाने पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील नागापूर शिवारातील एका गोदामा मध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी दारू तयार करताना आढळून आले. यामध्ये पाच कामगार ताब्यात घेतले आहेत. बनावट देशी दारू तयार करून त्याची बॉटलिंग करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
छाप्यात असा आढळून आला मुद्देमाल..
या ठिकाणाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पिरिटने भरलेले 200 लिटर क्षमतेचे एकूण 11 ड्रम, चारशे लिटर बनावट तयार देशी दारू, बनावट बुचे, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल्स, कागदी खोके असा बनावट दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य जप्त केले, तसेच या सोबत बनावट दारू तयार करून त्याची बॉटलिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे एक फुल्ली आटोमेटिक बॉटलींग मशीन, एक मॅन्युअल बॉटलींग मशीन, पाणी फिल्टर, मशीन ब्लेंड मिक्सिंग मशीन, बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्वाद अर्क, चार चाकी महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन MH-24AU 2594, एक पाण्याचा टँकर MH17 A 8810, दोन मोटरसायकली इ. साहित्य जप्त करण्यात आले. तसेच या गुन्ह्यातील पुढील तपासात एमआयडीसी भागात एका गोडाऊनवर धाड टाकली असता त्या ठिकाणाहून 180 मिली देशी दारू चे 36 खोके तयार दारू, 1000 लिटर स्पिरिट व 2 मॅन्युअल मशीन आढळून आल्याने हे साहित्यही जप्त करण्यात आले.
याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत कारवाई सुरू असून आरोपीकडून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट, बनावट लेबल्स, बुचे इत्यादी कुठून पुरवठा होत आहे. या कारखान्याचा मालक कोण आहे. याचा तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप व विभागीय उप आयुक्त औरंगाबाद पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डि. एल. दिंडकर, परिविक्षाधीन उपअधीक्षक इंगळे, निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक प्रविण ठाकूर, विभागीय भरारी पथक औरंगाबाद, गायकवाड, शेळके, घोरपडे, राठोड, वाघमारे यांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा : लसीच्या तुटवड्यानंतर पालिकेला जाग; कांजूर लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन