बीड - शहरातील सेंट पॉल स्कूलच्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. यामध्ये स्कूलच्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी औरंगाबाद येथील संजय पाटील, वंदना बेंजामिन सेंट पॉल स्कूलचे प्रमुख आशिष शिंदे, जयराम शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख असलेल्या सेंट पॉल स्कूलचे स्नेह संमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलागुण पाहून मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना औरंगाबाद येथील संजय पाटील म्हणाले, की या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी शिक्षक व पालक यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे. स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण वाढीस लावण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आज इंग्रजी भाषा ही जगाची भाषा होत आहे. यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना उत्कृष्ट शिक्षण दिले पाहिजे.
यावेळी देशभक्तीपर गीता मध्ये रिद्धी मिताली, अक्षरा, आकांक्षा, सई, प्रतिमा या चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला. स्नेह संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षकानी परिश्रम घेतले. यावेळी पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.