बीड - जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जिल्ह्यातील विविध गावांमधून दिंड्या नारायण गडावर दाखल होतात. जवळपास २ लाख भाविकांची मांदियाळी नारायण गडावर दरवर्षी आषाढी एकादशीला असते. विशेष म्हणजे येथे महादेवाची स्वयंभू मूर्ती व नगद नारायण स्वामींची येथे समाधी आहे. ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला चालत जाणे शक्य होत नाही, ते वारकरी आषाढीच्या दिवशी श्री क्षेत्र नारायणगडावर येऊन महादेवाचे दर्शन घेतात.
यावर्षीही ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त कीर्तन सेवा आयोजित केली जाते. प्रतिपंढरपूर म्हणून श्री क्षेत्र नारायण गडाचे महत्त्व असल्याचे येथील भाविकांनी सांगितले. श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या दिवशी येथे यात्रा भरते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधून दिंड्या श्री क्षेत्र नारायण गड येथे एकादशीच्या दिवशी दाखल होतात. दिवसभर विविध अध्यात्मिक कार्यक्रम होतात. इ. स. पूर्वीचे हे देखणे मंदिर आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता करून घेण्यात आलेली आहे. येणाऱ्या भाविकांना निवासाची देखील येथे व्यवस्था आहे. डोंगरावर वसलेल्या या नारायण गडावर श्रद्धा ठेवून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीच्या दिवशी चालत येतात.
जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे शेकडो वर्षापासून आषाढी एकादशी निमित्ताने हरी किर्तन तसेच अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात राबवले जातात. दोन लाखांपेक्षा अधिक भाविक दर वर्षी श्री क्षेत्र नारायण गड येथे येत असल्याचे येथील भाविक बळीराजा गवते, डॉ. बाळासाहेब पिंगळे यांनी सांगितले.