बीड : मुलाच्या हव्यासापोटी एक धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. चक्क पुरुष जातीचे बाळ चोरून नेऊन त्याठिकाणी स्त्री जातीचे बाळ आणून ठेवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर येथील सैफ शेख यांच्या पत्नी सफीना या प्रसूतीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी पुरुष जातीच्या बाळाला जन्म दिला. सिझर झाल्यामुळे सफीना यांच्यावर 6 दिवसापासून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहा मध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांना बाळ आपल्या जवळ नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, बाळ सापडत नसल्याने त्या आणि नातेवाईक घाबरून गेले. यादरम्यान, वॉर्ड क्रमांक आठ मध्ये एक स्त्री जातीचे बाळ टाकून दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.
याबाबत विचारणा केली असता रुग्णालयाचे डीन सुधीर देशमुख यांनी सदरील प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस करत आहेत. मात्र, रूग्णालयातील महत्त्वाच्या ठिकाणचेच कॅमेरे बंद असल्यामुळे यात अडचण येते आहे. निव्वळ मुलाच्या हव्यासापोटी हा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न