बीड - मातीच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. माती जिवंत राहिली तरच माणसे जिवंत राहू शकतील. हा विचार घेऊन बीडच्या एका तरुणाने वयाच्या 21 व्या वर्षी सेंद्रिय शेतीमध्ये काम सुरू केले. शेतकऱ्यांच्या शेतातील शेणाच्या उकिरड्यावरून सुरू झालेल्या बीडच्या या तरुणाचा प्रवास आजही सुरू आहे. गाईच्या शेणापासून तसेच इतर कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करत ऑरगॅनिक कृषी व्यवसायाला त्याने चालना दिली. एवढेच नाही तर जगभरातील 7 देशांमध्ये बीडच्या गांडूळ खताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील 5 लाख शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या तंत्रज्ञानाचे त्याने प्रशिक्षण दिले. सध्या बीड जिल्ह्यात 40 हजार शेतकरी ऑरगॅनिक शेतीचे प्रयोग करण्यासाठी या तरुणाच्या सोबत सरसावले आहेत.
ही यशोगाथा आहे, बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथील कृषिभूषण शिवराम घोडके यांची. लोळदगाव येथे बळीराजा कृषी विज्ञान मंडळ अंतर्गत सेंद्रिय शेती तसेच 'फार्मर फ्रेंड ऑरगॅनिक प्रोड्यूसर' कंपनी च्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतीमालावर विशेष प्रक्रिया केली जात आहे. 2002-03 या वर्षी शिवराम घोडके यांनी परभणी विद्यापीठातून बीएससी अॅग्रीकल्चरची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी एखाद्या अॅग्रिकल्चर कंपनीमध्ये नोकरी करावी, अशी घरच्या लोकांची इच्छा होती. मात्र, शिवराम यांनी नोकरी न करता कृषी क्षेत्रात इतरांपेक्षा वेगळे काम करण्याचा निश्चय केला. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे गांडूळ खत तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या शेतावरील शेणाच्या उकिरड्यावर गांडूळखत निर्मितीचे काम सुरू केले. त्यांचे हे काम पाहून गावातील लोक शिवराम घोडके यांच्या वडिलांजवळ म्हणायचे की, 'तुमचा मुलगा एवढा बी एस्सी शिकला तरी देखील लोकांच्या उकिरड्यावर का फिरतोय?' त्यांना तुच्छतेने पहायचे. मात्र, समाज काय म्हणतो याकडे लक्ष न देता शिवराम यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. त्यांच्या कामातील सातत्य व सेंद्रिय शेतीचा असलेला अभ्यास पाहून महाराष्ट्र सरकारने 2010 साली शिवराम घोडके यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले.
स्वतःच्या 20 एकर शेतीपासून केली सुरुवात -
बीड जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना ऑरगॅनिक शेतीचे महत्व लक्षात यावे, यासाठी शिवराम घोडके यांनी सर्वप्रथम स्वतःची 20 एकर शेती ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय खतापासून पिकवली. या सेंद्रिय शेती करण्याला सुरुवातीला शिवराम घोडके यांच्या घरातून देखील विरोध झाला. रासायनिक खत शेतीला दिले नाही तर शेती पिकणार कशी? अशी धारणा शिवराम यांच्या घरच्यांची देखील होती. मात्र, त्यांनी मोठ्या कष्टातून रासायनिक खता ऐवजी गांडूळ खत वापरून शेती करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवले. सेंद्रिय शेतीमध्ये शिवराम यांनी केलेले प्रयोग पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी त्यांच्या शेतीवर येऊ लागले.
हजारो शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण -
कृषी विभागाने देखील त्यांच्या कामाची दखल घेतली. लोळदगाव येथेच त्यांच्या शेतात बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यामध्ये प्रशासनाने शिवराम घोडके यांना मदत केली. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील पाच लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत लोळदगाव येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण शिवराम यांनी दिले आहे. यापैकी चाळीस हजाराहून अधिक शेतकरी हे बीड जिल्ह्यातील असून सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे प्रयोग बीड जिल्ह्यात सुरू आहेत. शिवराम घोडके यांच्या स्वतःच्या 20 एकर शेतीमध्ये ऊस, हरभरा, ज्वारी, सह इतर पिकांना रासायनिक खत न देता गांडूळ खत दिले जात असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
बीडच्या गांडूळ खताचे परदेशातही झाले नाव -
बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथे शिवराम घोडके यांनी तयार केलेल्या गांडूळ खताचे सॅम्पल जगभरातील सात देशांमध्ये पाठवले होते. याबाबत सांगताना शिवराम घोडके म्हणाले की, बायोडायनॅमिक क्षेत्रात काम करणारे पीटर पॉक्टर हे जेव्हा लोळदगाव येथील बळीराजा कृषी विज्ञान मंडळाअंतर्गत निर्मिती केलेल्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते, तेव्हा ते बीड येथून गांडूळ खत घेऊन गेले. हे गांडूळ खत इतर 7 देशांमध्ये देण्यात आले. इतरांच्या तुलनेत बीडचे गांडूळ खत उत्तम प्रतीचे असल्याचे पत्रही पीटर यांनी पाठवले. ही बाब बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये विश्वासार्हतेची गरज -
भविष्यात प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढवायचे असेल तर मातीचे आरोग्य टिकवणे आवश्यक आहे. रासायनिक खते वापरलेले फळभाज्या किंवा अन्नधान्य माणसाच्या शरीरासाठी घातक आहेत. त्यासाठी सेंद्रिय शेती हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीवर भर द्यावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑरगॅनिक फळभाज्या व कडधान्य अत्यंत विश्वासाने पिकवून ते लोकांना दिले. तर, सेंद्रिय शेतीबाबत विश्वासार्हता निर्माण होईल, अशी आशा शिवराम घोडके यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले गांडूळखत -
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या उकिरड्यावर गांडूळ खत तयार करावे, हा शिवराम यांचा पहिला प्रयत्न असतो. ज्या शेतकर्यांना हे शक्य नाही, त्या शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात म्हणजेच 200 ते 250 रुपये क्विंटल दराने गांडूळ खत उपलब्ध करून देण्याचे काम शिवराम घोडके यांनी केले आहे.