बीड - कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी शासकीय बीड सेंटरवर उपचार सुरू आहेत. या सेंटरवर जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाचे विशेष लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका शासकीय सेंटर वरून कोरोनाची सौम्य लक्षण असलेल्या २२ जणांनी कोविड सेंटर प्रशासनाला न सांगताच अर्धवट उपचार घेऊन पलायन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे इतरांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. अर्धवट उपचार घेऊन पळून गेलेल्या त्या रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णावर गुन्हा दाखल -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका पातळीवर शासकीय वसतिगृह तसेच इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. शिरूरच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे. सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात. १४ ते २१ मे या सात दिवसात या सेंटरमधून तब्बल २२ बाधित रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे. शिरूर, बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, पौंडुल, जांब, मानूर, हिवरसिंगा, झापवाडी, दगडवाडी, नारायनवाडी या गावातील हे रुग्ण आहेत. ज्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला. या रुग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधितावर कोणतीच कारवाई झाली नाही.
आरोग्य यंत्रणा झोपा काढत होती की काय? -
तब्बल सात दिवसात एकेक करून रुग्ण गायब होत असताना आरोग्य विभागाची यंत्रणा झोपा काढत होती की काय? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्या डॉक्टर आणि स्टाफ वर या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे. ते कशा पद्धतीने आपली कर्तव्य पार पाडतात हे यावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा बोलायला नकार -
या प्रकरणी पळ काढणाऱ्या रुग्णांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अद्याप पर्यंत कारवाई झालेली नाही. एकंदरीत या घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र याबाबत बोलायला तयार नाही.
हेही वाचा - १३७ वर्षापूर्वीचे दगड आणि लाकडाचे घर, काष्ठकलेचे एक अद्भुत उदाहरण