बीड - छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपकडून प्रकाशीत करण्यात आले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्ताकाचे नाव आहे. या पुस्तकावरुन महाराष्ट्रासह देशात वादंग निर्माण झाले आहे. यावरुन बीडमध्ये संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी, अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा कोणीच मोठा असू शकत नाही. या पुस्तकामुळे सबंध शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी, अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. याबाबत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या पुस्तकासंदर्भात आपली भूमिका मांडताना संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीच मोठा असू शकत नाही. याचे भान त्या लेखकाने व राज्यकर्त्यांने ठेवायला पाहिजे. जे पुस्तक भाजप सरकार जनतेमध्ये आणून मोदींची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या मोदींनी नोटबंदी करून जनतेला रांगेत उभे करून अनेकांचे बळी घेतले. तसा प्रकार कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेबरोबर केलेला नाही. याचे भान लेखकाने ठेवायला हवे होते.