आष्टी (बीड)- आष्टी तालुक्यात नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी दहा ग्रामपंचायतींवर तर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी तीन व माजी आमदार भिमराव धोंडे यांनी पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात अकराच ग्रामपंचायत असल्याने नेत्यांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
निकाल जाहीर होताच आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी तर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या संपर्क कार्यालयात आणि माजी आ. भिमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींवर नेमकी कोणाची सत्ता आली? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर
आष्टी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, यातील शेरी बु. गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. तर वटणवाडी, पिंपळा, धनगरवाडी (पिं), सुंबेवाडी, सोलापुरवाडी, खुंटेफळ(पुं), हातोला, डोईठाण, धनगरवाडी(डो), कऱ्हेवाडी व कऱ्हेवडगांव या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. यापैकी वटणवाडी, डोईठाण व सुंबेवाडी ग्रामपंचायतींवर आपल्या समर्थक गटाने विजय मिळवल्याचा दावा आजबे यांनी केला आहे. तर कऱ्हेवडगाव, कऱ्हेवाडी, डोईठाण, खुंटेफळ आणि हातोला या पाच ग्रामपंचायतींवर आपल्या गटाचा विजय झाल्याचा दावा माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केला आहे. तर डोईठाण, धनगरवाडी, सोलापूरवाडी, सुंबेवाडी,
वटणवाडी, खुंटेफळ (पुं), हातोला, पिंपळा, धनगरवाडी( पिं), कऱ्हेवाडी व कऱ्हेवडगांव या ग्रामपंचायतींवर आपल्या गटाने विजय मिळवल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची उत्तम कामगिरी
ग्रामपंचायत निवडणूक ही गावस्तरावर असल्याने याला पक्षाचे चिन्ह नसते, त्यामुळे विजय झालेले उमेदवार हे सगळेच एकञ येऊन लढत असतात. या निवडणुकीचे एवढे महत्त्व नसते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये चांगली कामगिरी केल्याची प्रतिक्रीया आजबे यांनी दिली आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टी मतदार संघामध्ये 90 टक्के जागांवर भाजप उमेदवारांचा विजय झाला असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.