बीड- जिल्ह्यात अत्यल्प पाऊस असल्याने दुष्काळी स्थिती आहे. मात्र, सोमवारी रात्री साडेआठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारण दीड तास पाऊस सुरू होता. या पावसामुळे बीड शहरातील बस स्थानक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लेंडी रोड या मार्गावर सकल भागात ठिकाणी पाणी साचले होते. काही भागातील तळमजल्याच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र पहायला मिळाले. परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने तात्पुरता का होईना जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. गणेशोत्सवादरम्यान पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र निराशा पदरात पडली. परंतु, सोमवारी रात्री साडेआठ वाजता बीड शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. साधारणत दीड तास सुरू असलेल्या पावसामुळे पाणी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामध्ये बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याला तळ्याचे स्वरूप आले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी, परळी तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसावरच जिल्ह्याची व मराठवाड्याची मदार आहे. अन्यथा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोमवारपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण सरासरी 327 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेला पाऊस अत्यंत अल्प आहे. यामुळे बीड जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जाते. मात्र सोमवारी पडलेल्या पावसामुळे परतीचा पाऊस सक्रिय होण्याची आशा निर्माण झाली आहे.