आष्टी (बीड) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील आणि महाराष्ट्र राज्यातील भाजपा शिवसेना युतीचे शासन असे डबल इंजिन सरकार सध्या असल्यामुळे आता विकासाची गाडी थांबणार नाही. गोपीनाथ मुंडेंचे बीड जिल्ह्यातील रेल्वेचे स्वप्न साकार झाले आहे. हे स्वप्न अपुरे आहे. परळीपर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करणे हीच गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली ठरणार आहे. असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे सांगितले.
४२ वर्षे बरोबरीने राजकारण - यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, माझी राजकीय कारकीर्द गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबरच सुरू झालेली आहे. आम्ही ४२ वर्षे बरोबरीने राजकारण केले. मुंडे साहेबांचे कार्य अतुलनीय आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे बीड रेल्वेचे स्वप्न परळी पर्यंत रेल्वे पूर्ण करून आपणच पूर्ण करूत याची मी सर्वां समक्ष ग्वाही देतो. २०२४ पर्यंत बीड आणि परळी पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असे ते म्हणाले.
कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यासाठी आणणारच - कृष्णा खोऱ्याचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यासाठी गोदावरी खोऱ्यामध्ये सोडणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावामध्ये कर्जत तालुक्यातील शेमपुरा येथून उजनीचे बॅकवॉटरचे पाणी उचलून थेट जलद्वाहिनीद्वारे सोडण्याच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येईल. असे आश्वासन आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना दानवे यांनी दिले.आष्टी येथे दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने आष्टी ते अहमदनगर या रेल्वे सेवा शुभारंभा वेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार शिवाजी कर्डीले, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी, उपमहाव्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडेंचे या रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण योगदान - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे यांचे अतूट नाते आहे. आम्हाला त्यांनी राजकारणामध्ये बोटाला धरून मार्गदर्शन केलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खासदार केशरबाई क्षीरसागर, रेल्वे कृती समिती या सर्वांपेक्षा गोपीनाथ मुंडेंचे या रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर्वात जास्त सहभाग त्यांचा राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने आजवर २००० कोटी रुपये निधी दिला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आत्तापर्यंत १४०० कोटी रुपये निधी दिला आहे. त्यातील १२०० कोटी रुपये आपण मुख्यमंत्री असताना दिलेले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे म्हणाल्या,आष्टी नगर रेल्वे मार्गाच्या शुभारंभाने विकासाचे नवीन द्वार उघडले आहे. स्वप्नांच्या पूर्ततेचे पहिले पाऊल हे आहे. बीड जिल्ह्यातील जनता गेली पाच दशके या क्षणाची वाट पाहत होती.