बीड - पश्चिम बंगालच्या मुलींना बीडमध्ये आणून वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह (आंन्टी) दलालाला ताब्यात घेतले आहे. राधिका दत्ता वाघ (वय ३२), ज्ञानदेव बाळासाहेब रोकडे (रा. बीड) असे आरोपींची नावे आहेत. पीडित महिला ही पश्चिम बंगालची असून आन्टीने पीडितेला मुंबईहून विकत आणले होते.
हा प्रकार बीड शहरातील शिवाजीनगर भागातील शाहू विद्यालयाच्या समोरील इमारतीत घडला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे. दलाल ज्ञानदेव रोकडे व आन्टी राधिका वाघ हे व्हाट्सअपवरून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवित असत आणि पीडितेला वेश्याव्यवसाय करावयास भाग पाडत होते. हा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला कळल्यानंतर पथक प्रमुख राणी सानप यांनी पथकासमवेत सापळा रचून डमी ग्राहक पाठवला. या सापळ्यामध्ये आंन्टी राधिका वाघ व दलाल नामदेव रोकडे तसेच पश्चिम बंगाल येथील एक पीडित महिला अडकली.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेला आंन्टी व दलालाने मुंबईहून विकत आणले होते. बीड शहरातील शाहूनगर भागात आंन्टीने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. व तेथेच राजरोस कुंटणखाना सुरू होता. अखेर मंगळवारी पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला.