परळी - शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणाऱ्या वृद्धाचे तब्बल 1 लाख 72 हजार रुपये हरवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी या वृद्धाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये या वृद्धाला त्याचे पैसे परत मिळून दिले आहेत.
पैसे मिळताच वृद्धाला अश्रू अनावर
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक वृद्ध भिक मागून आपला उदरनिर्वाह करत आहे. या वृद्धाने त्याच्याकडे जमा झालेले पैसे एका पिशवीमध्ये ठेवले होते. मात्र सोमवारी ही पिशवी हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपले पैसे हरवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन पैशांचा तपास केला असता, एका पडक्या वाड्यामध्ये त्यांना ही रक्कम आढळून आली. पोलिसांनी रक्कम मोजली असता या पिशवीमध्ये तब्बल 1 लाख 72 हजार रुपये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या वृद्धाला पोलीस ठाण्यात बोलावून ती रक्कम त्यांच्या ताब्यात दिली. हरवलेले पैसे मिळताच वृद्धाला अश्रू अनावर झाले.
हेही वाचा - अन् रोहित पवार झाले सैराट..कोविड सेंटरमध्ये झिंगाटवर केला अफलातून डान्स