बीड : सध्या वाढीव वीजबिलावरुन मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू असतानाच, परळी वैजनाथ येथील शिवाजीनगर थर्मल रस्ता भागातील एक वीज ग्राहक उपोषणास बसले आहेत. वीज जोडणी नसतानाही तब्बल ५४ हजार रुपये एवढे दिलेले बील कमी केले जात नाही, आणि नवीन विज जोडणी केली जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
शिवाजीनगर थर्मल भागातील वीज ग्राहक चंद्रकला निवृत्तीराव घुंबरे यांनी घरगुती कामासाठी वीज जोडणी घेतली होती. त्यांचा ग्राहक क्रमांक ५८९०६०४५५७६१ असा आहे. हे वीजग्राहक काही कारणास्तव बाहेरगावी राहण्यास गेल्यामुळे त्यांनी २२ जुलै २०१५ येथील स्थानिक वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयास लेखी अर्ज देऊन वीज जोडणी बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सदर मीटर व वायर काढून नेले होते.
मीटर पीडी केले नसल्याने आले वीजबिल..
परंतु त्यांनी सदर मिटर पी.डी. करणे आवश्यक असताना ते केलेच नाही. त्यामुळे चंद्रकला घुंबरे ५४ हजार रुपयांचे बिल देण्यात आले, जे चुकीचे आहे. त्यामुळे घुंबरे कुटुंबीय अद्यापही अंधारात आहेत. याबाबत घुंबरे यांनी ग्राहकांशी संबंधित कार्यालयाला वेळोवेळी अर्ज देऊन विजबिल दुरुस्त करून पुन्हा नव्याने मीटर जोडून देण्याची विनंती केली असता, संबंधित कार्यालयाने अद्याप त्यांच्या अर्जाची दखल घेतली नाही.
न्यायासाठी आमरण उपोषण..
त्यामुळे चंद्रकला यांचे पती निवृत्ती घुंबरे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर बुधवार (ता.१७) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत वीजबील रद्द करून, नवीन जोडणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे घुंबरे यांनी यावेळी सांगितले.