बीड - मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडूण आणण्यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील काका - पुतण्याची लढत ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेते गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी खुद्द बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी प्रितम मुंडेंना जाहीर पाठिंबा दिला होता.
बीड जिल्ह्यातील दोन लढती या अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. एक म्हणजे परळी विधानसभेची. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात लढत होत आहे. तर दुसरी महत्वाची लढत म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर. लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत असूनही त्यांनी प्रितम मुंडेंना जाहीर पाठिंबा दिला होता. आता क्षीरसागर यांच्या उपकाराची उतराई होण्यासाठी स्वत: पंकजा मुंडे या जाहीर सभा घेणार आहेत.
जयदत्त क्षीरसागर आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी अडचणींच्या काळात एकमेकांसाठी धावून जाण्याची परंपरा आधी पासूनच होती. लोकसभा निवडणुकीत खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीमध्ये असताना जयदत्त क्षीरसागर धावून आले. याची परतफेड करण्यासाठी आता जयदत्त क्षीरसागरांसाठी पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत. त्याच्या प्रचार संभाचा धडाका सुरू होणार आहे. पहिली सभा उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजता रायमोहा येथे होत आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्षीरसागर आणि मुंडे या दोन कुटुंबाचा जिव्हाळा आणि सलोखा वर्षानुवर्ष कायम आहे. राजकीय विचारधारा वेगवेगळी असतानाही या दोन कुटुंबानी एकमेकांच्या हिताचा विचार नेहमीच केला आहे. अडचणीच्या काळात या दोन कुटुंबानी राजकीय चपला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत प्रितम मुंडे यांच्या प्रचारासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी 21 दिवस अहोरात्र परिश्रम घेतले. जिल्हाभरातील कार्यकर्ते कामाला लावले.
लोकसभा निवडणुकीत मुंडे भगिनी अडचणीत असताना जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज बीडमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे.