बीड- माझी लढाई कोण्या एका व्यक्तीशी नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे. माझे विरोधक स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. पण, मी मात्र तुमच्या सेवेसाठी लढत आहे, असे सांगत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले.
हेही वाचा - बीडमध्ये 24 तासात 214 मि.मी. पाऊस; पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
परळी मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुंडे बोलत होत्या. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुंडे साहेबांचे नाव पुसण्याचा बारामतीच्या मंडळीचा प्रयत्न -
पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नाव पुसायला निघाली आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी ते पुसले जाणार नाही. कारण या भागातील जनतेने त्यांच्यावर पोटच्या लेकरासारखे प्रेम केले आहे. राष्ट्रवादी आता संपली असून बुडत्या पक्षाला आधार देण्याचे काम सुज्ञ जनता करणार नाही. अशा बुडत्या पक्षाचे नेते केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बीड जिल्ह्यात येतात आणि फोडाफोडीचे, जाती पातीचे राजकारण करतात, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.
हेही वाचा - बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी; शहरातील सखल भागात साचले पाणी
मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, रावणराव गिते, शामराव आपेट, गौतमबापू नागरगोजे, शेख अब्दुल करीम, डॉ. शालिनी कराड, दत्ता देशमुख, वैजनाथ जगतकर, वृक्षराज निर्मळ, रमेश कराड, गणेश कराड, श्रीराम मुंडे, अविनाश मोरे, संजय गिराम, विलास जगताप, राजेश गिते, सुधाकर पौळ, प्रा. पवन मुंडे, दत्ता कुलकर्णी, प्रकाश जोशी, उमेश खाडे, नितीन ढाकणे, प्रा. बिभीषण फड, रवि कांदे, हनुमंत नागरगोजे आदींसह सर्व बुथचे प्रमुख तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.