आष्टी(बीड)- तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडल्या आहेत. वाघळूज येथे शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर कडा धामणगाव मार्गावर भरधाव कारने शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वरांना धडक दिल्याने २ जण गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमीवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनेने आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील नगर-जामखेड मार्गावरील दावल मलिक हॉटेलजवळ शनिवारी (दि.5) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने पांडुरंग महादू हाते (वय-40 रा.पिंपरी चिंचवड पुणे) यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह कडा येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुसरा अपघात कडा-धामणगांव मार्गावरील सासुसूनाचा माळ येथे शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या विना क्रमांकाच्या स्वीफ्ट कारने दुचाकीला (एम एच 16 सी टी 5317) जोराची धडक दिली.या अपघातात ऋषिकेश चंद्रकांत लोखंडे (वय 21) व गणेश सांगळे (वय 21) रा. धामणगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या दोन्ही घटनेने आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.