बीड- कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला कोरोना विषाणूला हरवायचे आहे. येत्या जुलै व ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील. त्यामुळे घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. जिल्हा आरोग्य प्रशासन भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करायचा आहे, असे आवाहन बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले आहे.
साधारणत: २५ ते २८ लाख लोकसंख्या असलेल्या बीड जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. यापैकी ८६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या २१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वरील आकडेवारी लक्षात घेता बीड जिल्ह्यातील कोरोना आरोग्य विभागाच्या नियंत्रणात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार आता अनलॉक सुरू झाले आहे. नागरिक कोणत्याही कारणाने घराबाहेर पडतात. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातली कोरोनाविषयीची भीती कमी झालेली आहे. परंतु, आता पुन्हा पहिल्यासारखे सुरक्षित जगायचे असल्यास लस बाजारात येणे, हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, तोपर्यंत प्रत्येकाला स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे.
येणाऱ्या जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढू शकते. याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी दुजोरा दिलेला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जरीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे, नियमांचे पालन केले तर उद्भवणारी कुठलीही व कितीही बिकट परिस्थिती असली तरी आपण हाताळू शकतो, असे त्यांनी सांगितले.