बीड - जावई म्हटलं की, मानपान-सन्मान आला. मात्र, जिल्ह्यातील एका गावात धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ऐकून गोंधळात पडलात ना, मात्र ही प्रथा एका गावात गेल्या ९० वर्षांपासून चालत आली आहे.
दरवर्षी धुलिवंदनच्या निमित्ताने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जावयाला उभा पोशाख करून परत पाठवतात. धुलिवंदनच्या २ दिवस अगोदर संपूर्ण गाव जावयाचा शोध घेत असते. जो जावई मिळेल त्याला पकडून गावात आणून गाढवावरून मिरवणूक काढली जाते. जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा या गावी ही अनोखी प्रथा सुरू आहे.
अशी सुरू झाली ही परंपरा -
९० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाली. असे सांगितले जाते की, गावातील ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला पहिल्यांदा ९० वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी गाढवावर बसवून त्यांची गावभर मिरवणूक काढली. हनुमान मंदिराच्या पारावर ही मिरवणूक आणली व त्यानंतर त्या नाराज झालेल्या जावयांचा पारावर मोठा सन्मान केला. त्यांना उभा पोशाख करून सोन्याची अंगठी दिली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली ते आतापर्यंत सुरूच आहे. आता या वर्षीचा जावई कोण? यासाठी गावकरी जावयाचा शोध घेत आहेत. ही अनोखी परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. याची मोठी चर्चा राज्यभरात होत असते.
धुलिवंदनच्या दिवशी डॉल्बी लावला जातो. संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येऊन रंग खेळते. मोठ्या उत्साहात होणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावचे नागरिक देखील धुलिवंदनच्या दिवशी गावामध्ये येतात. ही प्रथा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे.
मिरवणुकीसाठी असा हेरतात जावई -
धुलिवंदनच्या २ दिवस अगोदरपासूनच गावातील काही लोक जावयावर नजर ठेवून असतात. जावई कुठे आहे त्याची माहिती काढतात व नंतर एक दिवस अगोदर त्या जावयाला गाडीत घालून विडा येथे आणले जाते. धुलिवंदनच्या दिवशी त्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या पारावर उभा पोशाख, सोन्याच्या अंगठी करून पुन्हा त्या जावयाला त्याच्या गावी नेऊन सोडले जाते. यावर्षी गावकऱ्यांनी जावयाचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यांचा गळाला यावर्षी कोणता जावई लागेल, हे धुलिवंदनच्या दिवशीच कळेल.