बीड - माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचे पक्षाने मंत्रिपद डावलले आहे. यामुळे पक्षावर नाराज असलेले सोळंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी (दि.31डिसेंबर)ला दुपारी विधानसभा अध्यक्षांची वेळ त्यांनी मागितली आहे.
याबद्दलची नाराजी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आमदार सोळंके यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश येणार की, सोळंके राजीनामा देणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजलगाव मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी आता राजीनाम्याचं अस्त्र उगारलंय. एकीकडे पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे मिळाली असून वरिष्ठांनी डावलल्याने अनेक ठिकाणी नाराजीचा सुर आहे. सध्या बीडकडे धनंजय मुंडे यांच्या रूपाने एकच मंत्री आहे.