बीड - जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी सोडचिठ्ठी देऊन मुंदडा कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला. नमिता मुंदडा यांनी पक्ष बदलून भाजपकडून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली. आता ही दोन दिग्गज कुटुंबातील लढत प्रतिष्ठेची झाली आहे.
केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या नमिता मुंदडा या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेऊन मुंदडा कुटुंबीयांना भाजपमध्ये घेतले आणि उमेदवारी दिली, अशी चर्चा आहे. केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी स्वतः शरद पवार यांनी नमिता मुंदडा यांचे नाव जाहीर केले होते. मुंदडा कुटुंबीयांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज साठे यांना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
हेही वाचा - परळीत कसली असुरक्षितता ? वहिनीने दिले नणंद पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सद्यस्थिती पाहता, केज विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढलेले मुंदडा कुटुंब यशस्वी होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामुळे लोकांचा राग पक्षावर आहे की नेत्यांवर हे या लढतीतून स्पष्ट होईल.