बीड - कोरोनाच्या संकट काळात ऊसतोडीला जाण्यापूर्वी आपल्या मुलींची अल्पवयातच लग्न लावून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील सात महिन्याच्या काळात सत्तरहून अधिक बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासन व बाल कल्याण समितीचे तत्वशिल कांबळे यांना यश आले आहे. याशिवाय अल्पवयात लग्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांवर गुन्हा देखील नोंद झाला आहे.
बालवयातच मुलींची लग्न
मराठवाड्यात परभणी व बीड जिल्ह्यात बालविवाह करण्याचे प्रमाण अधिक आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलींची लग्न लावून नयेत यासाठी कायदे आहेत. मात्र यातून पळवाट काढत सर्रास बालवयातच मुलींची लग्न लावून दिली जात आहेत. बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. दरवर्षी बीड जिल्ह्यातून सात ते आठ लाख ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जातात, अशा सगळ्या परिस्थितीत ऊस तोडीला जाण्यापूर्वी मुलीचे लग्न लावून आपल्या खांद्यावरचे ओझे कमी करायचे, अशी मानसिकता वाढत असल्यानेच बीड जिल्ह्यात मुलींची अल्पवयात लग्न होऊ लागली आहेत. मागील सात ते आठ महिन्यांमध्ये सत्तरहून अधिक बालविवाह रोखले असल्याचे बालकल्याण समितीचे तत्वशिल कांबळे यांनी सांगितले. याशिवाय तिघा जणांवर गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे.
अशी करतात कारवाई
जेव्हा एखाद्या गावात बालविवाह होत असल्याची तक्रार येते तेव्हा प्रशासन आणि पोलिसांना तत्काळ माहिती दिली जाते. यावर वयाचा दाखला तपासून खात्री केली जाते. वधू आणि वराकडील आई वडिलांचे समुपदेशन करुन नोटीस बजावली जाते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीची गरज
बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन , संस्थांनी आणखी जनजागृती करण्याची मुलीचे वय 18 वर्षे, तर मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह करणे बंधनकारक आहे. त्या आगोदर विवाह केल्यास तो गुन्हा ठरतो. यात शिक्षेसह एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे.
हेही वाचा - "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून लवकर निर्णय घेणार"